राज्यातील हिंसाचाराविरुद्ध मुंबई भाजपची निदर्शने
राज्यातील हिंसाचाराविरुद्ध मुंबई भाजपची निदर्शने.
मुंबई, दि. २२ नोव्हेंबर :
मालेगाव, नांदेड व अमरावतीमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनांच्या निषेधार्थ मुंबई भाजपनं बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला. मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक धार्मिक दंगली घडवल्या. रझा अकादमीने मोर्चे काढत खोट्या अफवा पसरवत हिंसाचार घडवला. मात्र महाविकास आघाडी सरकारने दंगली घडवणाऱ्यांना पाठीशी घातलं असून स्वतः:च्या सरंक्षणासाठी रस्त्यावर उतरलेलया नागरिकांवर लाठीचार्ज करत खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप लोढा यांनी केला.
लोढा म्हणाले की, राज्यसरकारने दंगेखोरांना पाठीशी घातलं महाविकास आघाडीमुळंच या दंगली महाराष्ट्रात होत आहेत. त्याचाच निषेध म्हणून आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. असा हिंसाचार आम्ही मुंबईत होऊ देणार नाही .‘हिंदू के सन्मानमें भाजप है मैदानमें’ अशी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. हिंसक घटनांच्या निषेधार्थ मुंबई भाजपच्या उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई यांच्या वतीने मुंबईचे प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, खासदार गोपळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार पराग आळवणी, आमदार सुनिल राणे, आमदार अमित साटम, आमदार मिहीर कोटेजा, आमदार मनिषाताई चौधरी, आमदार विद्याताई ठाकुर तसेच नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
