विठ्ठला, महाराष्ट्रावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट कर
विठ्ठला, महाराष्ट्रावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट कर.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा.
पंढरपूर, दि. 15 नोव्हेंबर :
महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठल चरणी घातले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विठ्ठलाच्या आशीर्वादाने राज्यावर आलेले कोरोनाचे संकट कमी होत असून येणाऱ्या काळात संपूर्ण जगातून कोरोना नाहीसा होवो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना आहे असे सांगून पवार म्हणाले, चीन, रशिया व युरोप देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासन कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. दोन्ही डोस घेतले असले तरी प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर केलाच पाहिजे. तसेच शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे ही एक नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. कोरोना काळात आपल्या जिवाभावाचे अनेक लोक दगावले. या काळात माणसाचा जीव खूप महत्त्वाचा होता तसेच आपली श्रद्धा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहून सर्व प्रशासकीय नियमाचे पालन करून राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा शासनाने निर्णय घेतला. तसेच कार्तिकी वारीसही परवानगी दिली.
