…. हा आरोग्ययज्ञ अखंडितपणे सुरू रहावा हीच इच्छा
…. हा आरोग्ययज्ञ अखंडितपणे सुरू रहावा हीच इच्छा : एकनाथ शिंदे
ठाणे ग्लोबल कोविड केअर सेंटरच्या जागी लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करणार.
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा चौथा वर्धापनदिन उत्साहात संपन्न.
ठाणे, दि. 14 नोव्हेंबर :
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून ठाण्याच्या छोट्याशा ऑफिसमधून सूरु करण्यात आलेला हा आरोग्ययज्ञ यापुढेही अखंडितपणे सुरू रहावा अशी इच्छा राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. निमित्त होतं बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे..
शिवसेनेच्या वतीने चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षरुपी रोपट्याला आता बहर येऊ लागला आहे. कोरोना काळात अखंडितपणे रुग्णांना सेवा देणारा मदत कक्ष अशी या वैद्यकीय मदत कक्षाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. अवघ्या चार वर्षांत लाखो रुग्णांना मदत करण्यासोबतच तब्बल 60 कोटी रुपयांची सवलत रुग्णांना मिळवून देण्यापर्यंत काम या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ठाणे शहरातून सुरू झालेले वैद्यकीय मदत कक्षाच्या 22 जिल्ह्यामध्ये शाखा पसरल्या आहेत. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकप्रतिनिधी आम्हाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आमच्या भागात सुरू करण्याची मागणी करत आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याची भावना या कक्षाचे संस्थापक, मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

कोणतंही संकट समोर येवो सांगली, कोल्हापूर, महाड, चिपळूण, खेड, पाटण, केरळ येथे आलेला पूर असो प्रत्येक ठिकाणी सेवा देण्यासाठी आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तत्पर असतो. महापुरानंतर गावागावात रोगराई पसरू नये यासाठी या कक्षातील डॉक्टर आणि कार्यकर्त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आज या मदत कक्षाशी जोडलेले डॉक्टर कोणतीही आपत्ती अली तर स्वतःहून आम्हाला फोन करतात की आम्ही कधी मदत घेऊन जायचं ते सांगा ही या मदत कक्षाची ताकद आहे असे शिंदे म्हणाले.
कोरोना काळात अवघ्या 22 दिवसात 1150 बेडसचे रुग्णालय उभे करून त्यात आयसीयू, डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आगामी काळात याच तातपुरत्या रुग्णालयाचे कायमस्वरूपी रुग्णालयात रूपांतर करून तिथे कर्करोग रुग्णालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला फोन आला की आम्ही तो वैद्यकीय मदत कक्षातील कार्यकर्त्यांना देतो आणि त्यानंतर एक दिवस तो माणूस त्यांना झालेल्या मदतीसाठी आम्हाला आभार मानायला येतो असं अनेकदा घडत असल्याचा अनुभव कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितला. राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक कार्यकर्ते आज आम्हाला वैद्यकीय मदत कक्षात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगत फोन करतात हे या कक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. इतर लोकप्रतिनिधींनी देखील वैद्यकीय कक्षाचे हे मॉडेल राबवायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोविड योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला पर्यटन, विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, कामगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्री बचचू कडू, आमदार निलेश लंके, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. अदिती तटकरे यांनी महाड येथील पुरांनातर शिंदे यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे विशेष आभार मानले, तर निलेश लंके यांनी वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना आपल्या मतदारसंघात राबवण्याची विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली, बचचू कडू यांनी पक्ष हा आमदार खासदार यांच्यापेक्षा कार्यकर्त्याने मोठा होत असतो, आणि समजात वैद्यकीय सेवे एवढी समाधान देणारी दुसरी गोष्ट नसल्याची भावना आवर्जून व्यक्त केली. तर ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी हा वैद्यकीय मदत कक्ष सुरू करून गोरगरीब रुग्णांना मदत केल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
या मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती, संस्था आणि रुग्णालयांना सन्मानित करण्यात आलं. तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या टीमचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
