पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे शांततेचे आवाहन
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे शांततेचे आवाहन..
अमरावती, दि. १३ नोव्हेंबर :
अमरावती शहर हे सांस्कृतिक लौकिक असलेले शहर आहे. विविध नवनव्या उद्योगांच्या उभारणीमुळे औद्योगिक शहर म्हणून विकसित होत आहे. अशा शहरात तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडणे अनुचित आहे. शांततेचा भंग करणे, अफवा पसरवणे असे प्रकार घडविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
शहरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्रीमती ठाकूर सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासमवेत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या. यावेळी त्यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पालकमंत्र्यांनी शहरात सक्करसाथ, इतवारा, वसंत चौक, ऑटो गल्ली, वलगाव रोड, जमिल कॉलनी आदी विविध परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व सर्वांना शांततेचे आवाहन केले.
समाजातील सर्व घटकांनी अमरावती शहरात एकोपा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे. सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
