Ads

--

तुम्ही किती लोकांना जेलमध्ये टाकणार ?

By Xtralarge News

November 13, 2021 11:33 am

Ads

तुम्ही किती लोकांना जेलमध्ये टाकणार ?

मुंबई दि. 13 नोव्हेंबर :
भाजपाकडून सातत्याने आघाडी सरकारच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. दोन – चार मंत्र्यांना मुद्दाम बदनाम करुन आत टाकलात तर बाकीचे आमदार आहेतच की…
आमच्याकडे कशाचीही कमी नाही…तुम्ही किती लोकांना बदनाम करणार…किती लोकांना आत टाकणार अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली.

भाजप ऐनकेन प्रकारे राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे सरकार लवकर जावं ही भाजपची इच्छा आहे मात्र देशाच्या घटनेच्या चौकटीत राहून आम्ही काम करतोय त्यामुळे सरकार बरखास्त करायचा अधिकार कुणाला नाही शिवाय चारचौघांची इच्छा असली तरी सरकार बरखास्त होवू शकत नाही असे जयंत पाटील ठणकावून सांगितले.

विधानसभेतील बहुमत जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकार जाणं शक्य नाही असे सांगतानाच ईडीची धाड पडणं हे आता नित्याचंच झालं आहे. राज्यातील जनतेला भाजपच्या या खेळाची सवय झाल्याने याचं विशेष अप्रुप वाटत नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार आहे म्हणून भाजपकडून सर्व यंत्रणांचा वापर होतोय मात्र त्यांचं सरकार असतं तर एकदाही छापेमारी झाली नसती असा सणसणीत टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी ज्या गोष्टी समोर आणल्या आहेत त्या धक्कादायक असून त्याबाबत एनसीबीने शहानिशा करायला हवी. खोटं प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आहे. या सगळ्या गोष्टीची शहानिशा एनसीबीने करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

नवाब मलिक हे सातत्याने आवाज उठवत असल्याने शेवटी एनसीबीला आर्यन खान केस दुसर्‍याच्या हातात द्यावी लागली. नवाब मलिक यांनी जे आंदोलन उभारले आहे त्या सर्वाला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले.

No comments to show.

Leave a Comment