मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा १४ ते १९ नोव्हेंबर ‘जनजागरण’ सप्ताह.
मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा १४ ते १९ नोव्हेंबर ‘जनजागरण’ सप्ताह.
मुंबई दि. १० नोव्हेंबर :
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृत्रीमरित्या महागाई वाढवून देशातील जनतेची लूट चालवली असून याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना पटोले म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सातत्याने इंधनाचे दर आणि महागाई वाढवून देशातील गरीब मध्यमवर्गीय जनतेची लूट करत आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्या किंमती दुप्पट वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमतीत एका वर्षात प्रति लिटर जवळपास ३५ रूपयांची वाढ सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात मात्र त्या दररोज वाढत आहेत. युपीए सरकारवेळी ४४० रुपयांना मिळणारा एलपीजीगॅस आता ९५० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस ९५० रुपयांपर्यंत महाग केला, गेल्या ८ महिन्यात केंद्र सरकारने जवळपास ७५ वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल ११० रुपये, डिझेल ९६ रुपये लिटर असून गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखारी करून जनतेचे आर्थिक शोषण चालवले आहे.
या कृत्रीम दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत पण जनतेचे रक्त शोषून उद्योगपती मित्रांचे खिसे भरण्यात मग्न असलेल्या मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या हालआपेष्ठा दिसत नाहीत. मोदी सरकारच्या या लोकविरोधी धोरणाबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते प्रत्येक शहरात आणि गाव खेड्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावात मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. केंद्र सरकारने इंधनदरवाढ करून महागाई कशी वाढवली आहे याची माहिती लोकांना देतील. या सर्व कार्यक्रमाची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवरून उपलब्ध करून दिली जाईल आणि जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
