फडणवीसांनी १४ कोटींच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबले
फडणवीसांनी १४ कोटींच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबले.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले.
मुंबई दि. १० नोव्हेंबर :
नवाब मलिक व देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या मालिकेत आज मलिकांनी फडणवीस यांच्यावर आणखी आरोप करून खळबळ उडवून दिली. १४ कोटी ५६ लाखांच्या बोगस नोटा ज्या पकडण्यात आल्या. त्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
बीकेसीमध्ये (८ ऑक्टोबर २०१७) बोगस नोटांचे कनेक्शन आयएसआय, पाकिस्तान व्हाया बांग्लादेश यांच्यामार्फत बोगस नोटा संपूर्ण देशात पसरवल्या गेल्या. ८ ऑक्टोबरच्या छापेमारीत १४ कोटी ५६ लाख पकडण्यात आले. मुंबईत एकाला अटक झाली. एकाला पुण्यात अटक करण्यात आली. त्यामध्ये इम्रान आलम शेख, रियाज शेख यांची अटक झाली. नवी मुंबईमध्येही कारवाई झाली. परंतु १४ कोटी ५६ लाख बोगस नोटांमधून ८ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले.
१४ कोटी ५६ लाख पकडण्यात आले बोगस नोटांचे प्रकरण होते. मग लगेचच जामीन कसा झाला. चौकशी का झाली नाही? जो पकडला त्याच्या भावाला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवला. हा योगायोग आहे? या केसचा इन्चार्ज हा समीर दाऊद वानखेडे त्यावेळी होता. डीआयआरमध्ये केस होती. १४ वर्ष वानखेडे मुंबईत आहे. १ जुलै २०१७ ला त्याचवेळी हे डिपार्टमेंट त्याच्याकडे होते. ही छापेमारी डीआरआयने केली होती. केस दाबण्यासाठी याच अधिकाऱ्यांचा वापर देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. २००८ मध्ये हा अधिकारी मुंबईत झोनल अधिकारी म्हणून पदावर येतो. तो १४ वर्ष मुंबई शहर सोडत नाही. यामागे काय राज लपलं आहे, असा घणाघाती आरोपही नवाब मलिक यांनी केला.
पाकिस्तानची बोगस नोट भारतात चालावी? प्रकरण दाखल होते आणि काही दिवसातच जामीन मिळतो. हे प्रकरण NIA कडे दिले जात नाही. नोटा कुठून आल्या. याची अंतिम चौकशी झाली नाही. कारण जे बोगस नोटांचे रॅकेट चालवत होते, त्यांना तत्कालिन सरकारचे संरक्षण होते. त्यासाठी गोष्ट रचण्यात आली की, तो काँग्रेसचा नेता आहे. तो कधीच काँग्रेसचा नेता नव्हता. परंतु पकडला गेला तर ते सर्व काँग्रेसवर बिल फाडण्याचा कट आखला होता.
