परमबीरसिंहांकडे कोणताही पुरावा कधीच नव्हता !
परमबीरसिंहांकडे कोणताही पुरावा कधीच नव्हता !
अर्नब व खा. देलकर प्रकरणामुळे अनिल देशमुखांवर जाणीवपूर्वक कारवाई !
मुंबई, दि. 4 नोव्हेंबर:
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्याकडे कोणताही पुरावा कधीच नव्हता. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार बदनाम करण्याबरोबरच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्नब गोस्वामी व भाजपाचे दिवंगत खासदार देलकर प्रकरणात उचललेली पावले न आवडल्याने नरेंद्र मोदी सरकारने देशमुख यांना टार्गेट केले, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.
यासंदर्भात सावंत पुढे म्हणाले की, मी पत्रकार परिषदेत परमबीरसिंहांचा खोटेपणा उघड पाडला होता. माझा प्रत्येक शब्द खरा झाला. त्यांच्याकडे कधीच कोणताच पुरावा नव्हता. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली असतानाही जाणीवपूर्वक गुन्हा नोंदविला गेला. एनआयएच्या आरोप पत्रात परमबीरसिंह यांनी सायबर तज्ञाला स्वतः ५ लाख रुपये दिले असल्याचा उल्लेख असतानाही खून व कटाचे आरोपी ते का नाहीत? एनआयए तपास करत असताना परमबीरसिंह कसे पळून गेले? केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनेच पळवले असे दिसत आहे, असेही सावंत म्हणाले.
