वानखेडेला अटक केल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होईल

0
20211024_190227

वानखेडेला अटक केल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होईल.

वानखेडे सारखा इमानदार व्यक्ती दहा कोटींचे कपडे घालू शकतो का?..

मुंबई दि. २ नोव्हेंबर :
समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही, असे प्रश्न उपस्थित करत आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर हल्लाबोल केला.

समीर वानखेडे जेव्हापासून एनसीबी विभागात आला तेव्हापासून वानखेडेने आपली प्रायव्हेट आर्मी बनवली. त्यात किरण गोसावी, मनिष भानुषाली, फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसूजा, इलू पठाण हे त्यात होते. ही प्रायव्हेट आर्मी मुंबईत ड्रग्जचा व्यवसाय देखील करते. नावासाठी केवळ छोट्या – छोट्या लोकांना पकडून कारवाई दाखवली जाते. तसेच वानखेडेच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली गोळा केली गेली. प्रभाकर साईलने सांगितल्याप्रमाणे आर्यन खान प्रकरणात १८ कोटींची वसुली मागितली गेली. सॅम डिसूजा देखील समोर आला असून त्यात त्याने पैसे मागितल्याबद्दल कबुली दिली आहे. मात्र एनसीबीचा यात हात नसल्याचे त्याने म्हटले असले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. किरण गोसावी कारवाईच्या ठिकाणी काय करत होता. १३ लोकांचे फोटो सर्व लोकांना आधीच कसे दिले होते? १५ दिवसांपासून प्लॅनिंग कशी चालू होती? हे प्रकरण पुर्ण फर्जीवाडा असून समीर वानखेडेंनी ते रचले होते, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. पहिल्या दिवसापासून मी या प्रकरणातील अनेक बाबी समोर आणल्या. मात्र ‘सत्यमेव जयते’ चा मुखवटा धारण करुन हे लोक प्रकरण दाबत होते असेही नवाब मलिक म्हणाले.

१५ ऑक्टोबर २०२० रोजी समीर वानखेडेंनी एक केस दाखल केली. याच केसमध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूर, दिपिका पदुकोण यांची एनसीबी कार्यालयात परेड केली गेली. आजपर्यंत ही केस बंद झालेली नाही किंवा चार्जशीट दाखल केलेली नाही. याच केसमध्ये हजारो कोटींची वसुली करण्यात आली आहे. मालदीव आणि दुबईमध्ये पैसे घेतले गेले. त्याचेही फोटो मी आधीच दिले आहेत. वानखेडेंनी सहपरिवार मालदिवचा दौरा केला. मालदिवला एवढे दिवस जाणे खर्चिक बाब असते. याची एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमने चौकशी करायला हवी, अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली.

एनसीबीचे ग्यानेश्वरसिंह आणि इतर अधिकारी टीव्हीवर येतात, तेव्हा त्यांचे कपडे आम्ही पाहिले. कुणाचेच हजार पाचशेच्यावर कपडे नाहीत.मग समीर वानखेडेच रोज ५० ते ७० हजारांचे शर्ट कसे काय घालतो? दोन लाखांचा पट्टा, एक लाखांची पँट आणि अडीच लाखांचे बुट घालून ते वावरतात. घड्याळ देखील २० ते ५० लाखांचे घालतात. वानखेडेंच्या या कलेक्शनची किंमतच पाच ते दहा कोटींची असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. वानखेडे सारखा इमानदार व्यक्ती दहा कोटींचे कपडे घालू शकतो का? महागडे कपडे घालण्यात वानखेडेंनी तर मोदींनाही मागे टाकले आहे अशी उपहासात्मक टीकाही नवाब मलिक यांनी केली.

जर एखाद्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उचलला नाही तर राज्य पोलिसांचे राज्य बनेल. समीर वानखेडे इमानदार आहेत तर त्यांनी आतापर्यंत मोठ्या लोकांना पकडले, त्या प्रकरणात कारवाई का नाही केली? फक्त काही ग्रॅम ड्रग्जवर कशी काय कारवाई केली? हे प्रश्न उपस्थित करत असतानाच नवाब मलिक यांनी जेएनपीटी बंदरावर तीन कंटेनर भरून ५१ टन अफूचे बीज १५ दिवसांपासून पोर्टवर असल्याचे सांगितले. या तीन कटेंनरवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई का नाही केली? मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले, तिथेही कारवाई का नाही केली गेली. ड्रग्जचा व्यवसाय राजकीय पाठबळाशिवाय चालू शकत नाही. ड्रग्जचा विळखा कायमचा नष्ट व्हावा, यासाठी आम्ही देखील सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. पण जर ड्रग्जच्या माध्यमातून जर वसुली गोळा केली जात असेल तर याच्या विरोधात लोकांनी उभे राहिले पाहीजे, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केली.

याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी जास्मिन वानखेडे यांच्या व्हॉट्सअप चॅटचे काही फोटो दाखवले. जास्मिन वानखेडे या सुरुवातीपासून बोलत होत्या की, त्या आपल्या भावाच्या कामात दखल देत नाहीत. पण या चॅटद्वारे असे दिसते की, ड्रग्ज प्रकरणात अडकलेला एक व्यक्ती जास्मिन वानखेडे यांना व्हॉट्सअपवर त्यांचा पत्ता आणि विझिटींग कार्ड मागत आहे. यावरुनच वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी आणि त्यांची बहिण लेडी डॉन वसुलीमध्ये सामील आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

वानखेडे महाराष्ट्र पोलिसांच्या अटकेपासून पळत आहेत. म्हणूनच त्यांनी सीबीआयद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तरीही महाराष्ट्र पोलीस याची चौकशी करेलच. माझ्या बोलण्यावर बंधने आणण्यासाठी ते याचिका दाखल करत आहेत. जर त्यांची सत्याची बाजू असेल तर त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *