एसटी कर्मचा-यांनो, दिवाळीत जनतेची गैरसोय टाळा

0
IMG_20210614_085231

एसटी कर्मचा-यांनो, दिवाळीत जनतेची गैरसोय टाळा

मुंबई, दि १ नोव्हेंबर :
एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीणी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण दिवाळीनंतर चर्चा करणार असल्याचेही ॲड.परब यांनी स्पष्ट केले.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहिर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट आज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ॲड. परब यांनी दिली. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक गर्तेत सापडले असताना देखील आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.

सध्या ८५ टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरु असून उर्वरीत १५ टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे”. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *