बीएमसी व बेस्ट कर्मचा-यांना 20 हजारांचे सानुग्रह अनुदान
बीएमसी व बेस्ट कर्मचा-यांना 20 हजारांचे सानुग्रह अनुदान
मुंबई, दिनांक 30 ऑक्टोबर :
बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी यांना दीपावलीसाठी २० हजार सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या कर्मचा-यांची दिवाळी धडाक्यात होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दीपावलीकरीता महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी, कर्मचाऱयांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या बैठकीत घोषित करण्यात आला. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम या क्रमाने माहिती पुढीलप्रमाणेः
१. महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षकः रु. २०,०००/-
२. माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळा यातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारीः रु. १०,०००/-
३. प्राथमिक शिक्षण सेवकः रु. ५,६००/-
४. आरोग्य सेविकाः रु. ५,३००/-
५. विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवकः रु. २,८००/-
बैठकीला उप महापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
