भंगारांचे एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही !
भंगारांचे एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही !
मुंबई, दि. 29 ऑक्टोबर:
नवाब मलिक यांनी एनसीबीच्या समीर वानखेडे यांची पोलखोल करताच त्यांच्या विरोधात भाजपाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. मलिक भंगारवाला आहे असा आरोप करताच त्याला मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नवाब मलिक म्हणाले की, माझी शंभर कोटीची औकातच नाही.भाजपने माझा ब्रॅण्ड शंभर कोटीचा केला आहे. सगळं विकलं गेलं तरी माझ्याकडे शंभर कोटी होणार नाहीत. मला भंगारवाला बोलत आहेत त्यांना माहीत नाही भंगारवाला काय असतो…होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी मुंबईत कपडे व भंगाराचा व्यवसाय केला. मी वयाच्या सोळा वर्षापासून राजकारणात आमदार होईपर्यंत भंगाराचं काम करत होतो. मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे असे ठामपणे नवाब मलिक यांनी आरोप करणार्या भाजपला सांगितले.
माझ्या आजोबाने डाकूकडून सोनं घेतलं नाही… माझ्या वडिलांनी चोराकडून सोनं खरेदी केलं नाही… मी स्वतः मुंबईत सोन्याची तस्करी केली नाही… बुलीयन मार्केट बुडवलं नाही…माझ्या घरावर सीबीआयची धाड पडलेली नाही…माझ्यावर कुठलेही आरोप नाही… मी टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनला दिलेला चेक बाऊन्स करण्याचं काम केलं नाही…मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेला चेक बाऊन्स केला नाही… होय मी भंगारवाला आहे… भंगारवाल्याची किमयागिरी काय असते यांना माहीत नसावी. एखादा भंगारवाला जी वस्तू उपयोगात नसते ती उचलून आणतो… त्याचे तुकडे तुकडे करून ते भट्टीत टाकून त्याचे पाणी पाणी करतो… नवाब मलिक जितके भंगार या शहरात आहेत त्या भंगारांचे एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला.
रेडकरताई तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणार्या लोकांच्या षडयंत्राचा भाग आहात. तुमचा नवरा त्या षडयंत्राचा भाग आहे. जो महाराष्ट्राला बदनाम करत आहे… सरकारला बदनाम करतोय… महाराष्ट्राची अस्मिता कशी संपुष्टात येईल यावर खेळत आहे. महाराष्ट्राच्या नावावर… स्थानिक अस्मितेच्या नावावरची जी चादर ओढण्याचे काम करताय त्यात कोणतीच मदत होणार नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहात. मुख्यमंत्र्यांनी कुणाला भेटावं कुणाला नाही हा त्यांचा अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रातील १४ कोटी जनता जर कुठला गुन्हा करत असेल तर आणि बोलत असेल की, आमचा गुन्हा माफ करा कारण आम्ही महाराष्ट्रात राहणारा आहे तर न्यायासमोर जात धर्म पंथ नसते. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्यामुळे ज्या काही गोष्टी समोर येत आहे त्यावर त्यांना शिक्षा होईल असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
