आदिवासी बांधवांसाठी लवकरच ‘राष्ट्रवादी आदिवासी विभाग’
आदिवासी बांधवांसाठी लवकरच ‘राष्ट्रवादी आदिवासी विभाग’
विक्रमगड दि. २३ ऑक्टोबर :
विक्रमगड भागात मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या. बऱ्याच स्थानिक ठिकाणी महिला लोकांचे प्रतिनिधित्वही करत आहे. हे चित्र फार आशादायक आहे. ही परिस्थिती अधिक सुधारावी म्हणून येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी विभाग काढून आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना या विभागामार्फत न्याय दिला जाईल अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
संवाद यात्रेदरम्यान ते विक्रमगड येथे बोलताना पाटील पुढे म्हणाले की, बुलेट ट्रेन… हायवे… कॉरिडॉर ट्रेनच्या नावावर इथल्या लोकांनी बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपण लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा करायचा याची खबरदारी घ्यायची आहे.
पालघरचा हा शेवटचा भाग मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पदाधिकाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता आहे. पवारसाहेबांवर प्रेम असणारे अनेक लोक या भागात आहे, पवारसाहेबांशी निष्ठा असणारी अनेक घरं या भागात आहे. लोकांचा सगळ्यात जास्त पाठिंबा असलेला नेता आपल्या पक्षाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या व्यक्तीमत्वाला साजेसा पक्ष आपल्याला येत्या काळात तयार करायचा आहे असेही जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
विक्रमगडवासियांनी सुनील भुसारा यांना आपली सेवा करण्याची संधी दिली आहे. भुसाराही आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. तुमच्या मतदार संघासाठी निधी खेचून आणत आहेत. भूसारा हा ‘आपला माणूस’ आहे, या आपल्या माणसाच्या मागे भक्कम उभे रहा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
