… म्हणून नवाब मलिक एनसीबीला टार्गेट करीत आहेत

0
IMG_20210524_184309

… म्हणून नवाब मलिक एनसीबीला टार्गेट करीत आहेत

मुंबई, दि. २१ ऑक्टोबर :
तपास यंत्रणेवर विनाकारण एखाद्या राजकीय नेत्याने किती बोलावे यालाही काही मर्यादा असतात. हा त्यांच्या बोलण्याचा अतिरेक होतोय. एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या व सकाळ, दुपार, संध्याकाळ एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे असाच प्रकार सध्या सुरु आहे. जे आरोपी आहेत, त्यांची केवळ बाजू घेण्याचा केविलवाणा प्रयत्न नवाब मलिक यांच्याकडून होत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

आपल्या जावयाच्या प्रकरणातून निराशा आल्यामुळे एनसीबीवर दबाव आणणे हे योग्य नाही. त्यांचे जावई आठ महिन्यांपासून अटकेत असून त्यांच्या अटकेचे धागेदोरे एनसीबीकडे असल्यामुळे एनसीबीला सतत दबावाखाली ठेवण्याचा नवाब मलिक यांचा हेतू दिसतोय. परंतु मलिक केवळ वल्गना करत असून त्यांच्याकडे एनसीबीच्या विरोधात कुठलेही पुरावे असतील तर ते न्याय यंत्रणेकडे द्यावेत, तुम्हाला कोणी अडवले? असे पक्षनेते दरेकर म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर पुढे म्हणाले की, अंमली पदार्थांच्या विरोधात जी कारवाई होतेय, त्याचे राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी समर्थन केले पाहिजे. राजकारणासाठी दुसरे व्यासपीठ आहे. आपल्या देशात कायदा हा सर्वांसाठी समान आहे. मोठ्या लोकांना वेगळा कायदा, गरिबांना वेगळा कायदा असे काही नसते, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

टार्गेट वसुली करणाऱ्या सरकारला वसुली या शब्दाच्या बाहेर पडणे शक्यच होत नाही. म्हणून वसुली हा शब्द महाविकास आघाडी सरकारचा परवलीचा शब्द झालेला आहे. वाझेने केलेली वसुली, वेगवेगळ्या खात्यातील वसुली आणि म्हणून प्रवक्त्यांच्या खात्यातील वसुली असा जप होतो आणि म्हणून रोज एनसीबीच्या तपासावर आरोप होत आहेत. एनसीबी जेवढा तपास करील तेवढे राज्याला, देशाला अंमली पदार्थाच्या विळ्ख्यातून बाहेर पडायला मदत होईल. पण नवाब मलिक यांना विचारूनच एनसीबी किंवा तपास यंत्रणांनी तपास करायला हवा का, असा सवालही दरेकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *