परराज्यातून धान आणणाऱ्यांवर कडक कारवाई करा

0
FB_IMG_1634615601051

परराज्यातून धान आणणाऱ्यांवर कडक कारवाई करा

गडचिरोली, दि. 19 ऑक्टोबर:
महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ दिले.

जिल्ह्यात धान उत्पादन जास्त असून बाहेरील धान जिल्हयात चोरून आल्यास, येथील धान खरेदी आणि साठवणूकीवर ताण येतो, राज्य शासनाचा पैसा वाया जातो. त्यामूळे परराज्यातील धानावर कारवाई करून आपल्या शेतकऱ्यांचे धान शंभर टक्के खरेदी केंद्रांवर पोहचेल यासाठी नियोजन करा अशा सूचनाही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मागील वर्षी धान साठवणूकीला, भरडाईला मोठ्या अडचणी आलेल्या होत्या, मात्र यावेळी जिल्हयात चांगले नियोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. टीडीसी साठी खरेदी केंद्रालगत आवश्यक गोदामे उपलब्ध होण्यासाठी गरजेनुसार तालुकानिहाय प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश संबंधित विभागास यावेळी दिले. राज्य शासन अन्न, नागरी पुरवठा मधून धान्य वाटपाबरोबर धान खरेदीबाबत करोडो रूपये खर्च करत असते. यासाठी या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करा. यातून गरजू नागरिक व आपल्याच शेतकऱ्यांना फायदा होईल. म्हणून धान खरेदी वेळेत न करणाऱ्या मीलसह परराज्यातील धान आणणऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे यावेळी सांगितले. यासाठी मनुष्यबळ कमी असल्यास नवीन रीक्त पदावरील भरतीबाबत विशेष बाब म्हणून काय करता येईल यासाठी प्रस्ताव सादर करा. दुर्गम भागात या विभागातील पदे रीक्त असता कामा नयेत अशा त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नक्षलग्रस्त भागात स्थानिकांना रोजगार व शेतीमधील उत्पादनाला सुयोग्य मोबदला मिळाला तर त्यांच्या कुटुंबांचा प्रश्न सुटेल. यातून जिल्हयातील नक्षलवादही आटोक्यात आणता येईल, असेही भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *