… तरीही महाराष्ट्रातील सरकार झुकणार नाही !
… तरीही महाराष्ट्रातील सरकार झुकणार नाही !
जनता भाजपाला सत्तेवरून खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही.
पिंपरी चिंचवड, दि. 18 ऑक्टोबर
राज्य सरकार अडचणीत आणण्यासाठी कधी सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सचा वापर करायचा. तर कधी एनसीबीचा वापर केला जात आहे. राज्य सरकारशी संबंधित लोकांवर विविध यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. तरीही महाराष्ट्रातील सरकार झुकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी महागाई, केंद्राम सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांवर टीका केली.
पवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकारचे काम राज्यांना मदत करणे असते. मात्र आज राज्यांना अडचणीत आणले जात आहे. महाराष्ट्राचा तीस हजार कोटींचा जीएसटीचा परतावा दिला जात नाही. महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न एका बाजूला करायचा आणि दुसऱ्या बाजूला सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जनतेचे हित जोपासण्याचे काम राज्यांचे असते. कारण जनता राज्यात राहत असते. त्यामुळे राज्यातील जनतेकडे दुर्लक्ष करण्याचे काम भाजप करत आहे. आज सत्ता त्यांच्या हातात आहे, पण हे जास्त काळ चालणार नाही. जनता एकेदिवशी यांना सत्तेवरून खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही.
जे सरकार कामगारांच्या हिताचे रक्षण करत नाही, ते सत्तेवर राहू शकत नाही. हे आज ना उद्या सांगावे लागेल. त्यासाठी देशातील जी महत्त्वाची शहरे हे ठामपणे सांगू शकतात त्यामध्ये पिंपरी-चिंचवड हे शहर आहे.
महागाईप्रमाणेच कामगार विरोधी धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे. आम्ही सत्तेत असताना कारखानदारी आणि कामगार टिकवण्याचा प्रयत्न केला, मात्र आज कामगारांना कामावरून काढले जात आहेत. कुणीही नोकरीवर कन्फर्म राहणार नाही, अशी कामगार विरोधी धोरणे आखण्याची आजच्या केंद्र सरकारची नीती आहे.
पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकारने जेवढा कर लावला आहे, त्यातील २५ टक्के कर जरी कमी केला तरी सामान्य जनतेवरील महागाईचा भार कमी होईल, असे मत देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी आपल्या लेखात मांडले आहे. मात्र केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायला तयार नाही, असेही पवार म्हणाले.
