आजचा महाराष्ट्र बंद सरकार पुरस्कृत दहशतवाद !
आजचा महाराष्ट्र बंद सरकार पुरस्कृत दहशतवाद !
मुंबई, दि. ११ ऑक्टोबर:
महाराष्ट्र विकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा भारतीय जनता पक्षाने समाचार घेतला. मावळच्या गोळीबारावेळी आणि राजस्थानच्या शेतकर्यांना तुडवले जाते तेव्हा या नेत्यांना जालियनवाला बाग आठवत नाही. लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. पण, पोलिस आणि संपूर्ण प्रशासनाचा गैरवापर करीत हा बंद केला जात आहे. अनेक योजना बंद, स्थगिती आणि आता पुन्हा बंद, हे अख्खं सरकार ‘बंद सरकार’ अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते आहे. लखीमपूरसाठी बंद आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत नाही. राज्यात 2000 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. ना कर्जमाफी, ना कोणती मदत. आजचा सारा प्रकार म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे. मंत्रिमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या सरकारमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल आणि यांना खरोखर शेतकर्यांप्रति कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्यांसाठी मदत जाहीर झाली पाहिजे.
आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात, तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले. आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलिसही बघ्याची भूमिका घेतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.
