उद्धव ठाकरेंचे राणेंवर नाव न घेता शाब्दिक ‘प्रहार’
उद्धव ठाकरेंचे राणेंवर नाव न घेता शाब्दिक ‘प्रहार’
कोकणात आंब्याबरोबर बाभळीही उगवल्या यात मातीचा दोष काय ?
चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यात राणे-मुख्यमंत्री राजकीय फटकेबाजी !
सिंधुदुर्ग, दि. 9 ऑक्टोबर:
सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे आज शानदार उद्घाटन झाले. परंतु या कार्यक्रमात नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय फटकेबाजीनेच हा कार्यक्रम जास्त चर्चेत राहिला. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे लोक पैसे खातात, विमानतळ उभे करण्यात आपलाच मोठं योगदान आहे हे सांगत आरोपही केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मग राणे यांचा अस्सल शालजोडीतून समाचार घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. काही लोक तळमळीने बोलताना काही मळमळीने बोलतात.
बाळासाहेबांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नसे म्हणून तर त्यांनी अशा लोकांना शिवसेतून बाहेर काढले असे राणेंचे नाव न घेता टोमणा मारला. कोकणातील माणूस मर्द आहे म्हणून तर त्यांनी विनायक राऊत यांना दोनदा खासदार म्हणून निवडून दिले. तर कोकण च्या मातीत आंब्याबरोबर बाभळी उगवल्या त्यात मातीचा काय दोष असा टोलाही मारला .
विमानसेवेचे श्रेय घेणा-या नारायण राणे यांचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला हे माहित आहे पण कोणी म्हणेल मीच बांधला. राणेंच्या मंत्री पदाचा उल्लेख करताना एकदम लघु, मध्यम असे मोठे खाते मिळाले याचा मला आनंद आहे असा म्हणत मिश्किल टोला मारला. एकूणच हा सोहळा राणे-ठाकरे यांच्या राजकीय वादानेच रंगला..
