एनसीबीच्या क्रूझ रेडवर नवाब मलिकांचा ‘दुसरा गंभीर बाॅम्ब’ !
एनसीबीच्या क्रूझ रेडवर नवाब मलिकांचा ‘दुसरा गंभीर बाॅम्ब’ !
एनसीबीने रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांना का सोडले?
मुंबई, दि. 9 ऑक्टोबर:
क्रूझवरील रेड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी सणसणाटी आरोपाचा दुसरा बाॅम्ब टाकला. या पार्टीतून अटक केलेल्या तिघांना एनसीबीने सोडून दिले. यातील एकजण भाजपा नेत्याचा मेहुणा आहे. त्याला व आणखी दोघांना सोडून देण्यात आले.
या तिघांना सोडण्यासाठी कोणी फोन केले ? व एनसीबीने का सोडून दिले ? व इतर 8 जणांनाच का अटक केली ? असे सवाल उपस्थित करत ही कारवाई बोगस होती व ठराविक लोकांनाच अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एकूण ११ लोकांना अटक केली होती. मात्र काही तासातच त्यातील तीन लोकांना सोडून देण्यात आले. रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. यापैकी रिषभ सचदेवा हा भाजपच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज ऊर्फ मोहित भारतीय यांचा मेव्हणा आहे.रिषभला अटक केल्यानंतर भाजपची सूत्रं हलली आणि या तिघांना सोडून देण्यात आले. हे सर्व महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे.
ज्यादिवशी एनसीबीने क्रूझवर छापेमारी केली. त्यादिवशी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी आठ ते दहा लोकांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्या रात्री ११ लोकांना अटक करण्यात आली होती. वानखेडे हे एक जबाबदार अधिकारी असूनही त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केले तसेच आता हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून याची तटस्थ समितीकडून चौकशी झाली पाहीजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती देणार असल्याचेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, रिषभ सचदेवा हा भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज ऊर्फ मोहित भारतीय यांचा मेव्हणा आहे. रिषभ सचदेवाने भाजपचा स्कार्फ घालून भाजपचा प्रचार करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. तसेच राष्ट्रपतीच्या हस्ते त्याने पुरस्कार देखील घेतला आहे. त्या रात्री रिषभ सचदेवांना देखील अटक करण्यात आली, मात्र दोन तासानंतर त्यांना सोडण्यात आले त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे वडील आणि काका उपस्थित होते.
आमीर फर्नीचरवाला आणि प्रतिक गाभाच्या निमंत्रणावरच आर्यन खान क्रूझवर आला होता, अशी माहिती वकील मानेशिंदे यांनी कोर्टात दिली आहे. आता अटकेत असलेल्या लोकांच्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारावर खटला सुरू आहे. मग एनसीबीने सोडून दिलेल्या तीन मुलांचे फोन जप्त केले आहेत का? या मुलांचाही फोन तपासावा. तसेच अटकेत असलेले लोक आरोपी आहेत की नाही? हे न्यायालय ठरवेल. पण अटकेचे हे पूर्ण प्रकरण कट-कारस्थान आहे. सोडलेल्या तिन्ही मुलांचे तसेच झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्डिंग काढावे, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र पोलिसांकडे करत आहोत.
फरार आरोपी एनसीबीचा साक्षीदार कसा?
के. पी. गोसावी हा क्रूझ ड्रग्जच्या दोन प्रकरणात साक्षीदार आहे. मुनमुन धमेचा आणि आर्यन खान प्रकरणात त्याने कोर्टात दोन वेगवेगळे पत्ते दिले आहेत. के.पी. गोसावी हा पुण्यातील फराजखाना पोलीस स्थानकात फरार आरोपी म्हणून नोंद आहे. मग आधीच आरोपी असलेल्या व्यक्तीला एनसीबीने साक्षीदार कसे केले? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणत आहेत की, माझ्याकडे माहिती असेल तर ती एनसीबीला द्यावी. पण ज्या यंत्रणेवर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यांनाच जाऊन माहिती देणे हे समंजस पणाचे लक्षण नाही. आम्ही मागणी करतो की, भाजपनेच एनसीबीच्या या कारवाईवर एखादी समिती बसवून चौकशी करण्याची मागणी करावी.
