देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण
देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशातील 35 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन
नवी दिल्ली/अमरावती, दि. 8 ऑक्टोबर :
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजन दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
पीएम केअर फंडातर्फे उभारण्यात आलेल्या देशभरातील 35 ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. त्याचा मुख्य सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे.
कोरोना संकटकाळातील अडचणींवर अथक प्रयत्नांतून केलेली मात, विविध सुविधांची वेगाने निर्मिती आदी बाबींवर प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. ते म्हणाले की, कोरोना संकटकाळात देशाने अत्यंत थोड्या काळात गतीने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उभारल्या. रूग्णालये, प्रयोगशाळा, ऑक्सिजन निर्मिती, लसीकरण मोहिम अशा कितीतरी गोष्टींना चालना देण्यात आली. अत्यंत थोड्या काळात देशाने उभारलेले हे कार्य समस्त भारतीयांच्या बंधुभाव व एकतेचे प्रतिक आहे. वैद्यकीय प्राणवायूची गरज लक्षात घेऊन उत्पादनात दसपट वाढ कऱण्यात आली. भौगोलिक वैविध्य पाहता देशाच्या कानाकोप-यात ऑक्सिजनची वेगवान वाहतूक हे आव्हान होते. मात्र, भारताने ते यशस्वीरित्या करून दाखवले. वायूसेना व डीआरडीओने त्यासाठी योगदान दिले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे मोठे नेटवर्क देशभर उभे राहिले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनची मागणी 23 मे. टन पर्यंत पोहोचली होती. हे लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचे उत्पादन तिप्पट वाढविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आजमितीला प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. पीएम केअर फंडातून ‘एल अँड टी’ आणि ‘डीआरडीओ’ यांच्या सहयोगातून हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात 17 पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे नियोजन असून, त्यातील 3 प्रकल्प पीएम केअर फंडातून उभारण्यात येत आहे. त्यात अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्प 1 हजार एलपीएम क्षमतेचा आहे. दुसरा प्रकल्प मोझरी येथील आयुर्वेद रुग्णालय येथे असून, त्याची क्षमता 1 हजार एलपीएम आहे. तिसरा प्लांट दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात असून त्याची क्षमता 200 एलपीएम आहे.
