आर्यन, अरबाजला अटक करणारे गोसावी व भानुशालीचा एनसीबीशी काय संबंध?
आर्यन, अरबाजला अटक करणारे गोसावी व भानुशालीचा एनसीबीशी काय संबंध?
एनडीपीएस कायदा भाजपच्या हातात आहे का?
मुंबई दि. ६ ऑक्टोबर :
एनसीबीने क्रूझवर छापा टाकून शाहरूख खानच्या मुलासह 8 जणांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली होती. पण एनसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर गौप्यस्फोट करून या कारवाईवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नवाब मलिक म्हणतात, मुंबईत एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी मुंबई – गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के. पी. गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाईल लोकांना अटक केली, याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे.
३ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राईम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडिओ दिले होते. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के. पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता.हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करुन के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के. पी. गोसावीवर पुण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फेसबुकवर तो खासगी हेर असल्याचे स्टेटस ठेवतो. के. पी. गोसावीचा एनसीबीशी काय संबंध आहे? हे आता समोर आले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे.
सध्या के. पी. गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाईल लॉक आहे. पण भानुशालीची हालचाल आम्ही शोधून काढली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. भानुशाली हा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी गुजरात मधील काही मंत्र्यांना भेटला होता. २१ सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर २८ तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय सामील होता? मनिष भानुशालीचे गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
क्रूझवर जे अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले जात आहेत, त्याचे फोटो देखील एनसीबीच्या मुंबईतील प्रांतिक कार्यालयात काढले गेले आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार अंमली पदार्थ जप्त केल्याच्या ठिकाणीच त्याचा पंचनामा झाला पाहिजे. मग क्रूझवर अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ का नाही काढले गेले? असाही प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरदेखील एनसीबीचे कार्यालय चर्चेत आले होते. त्यावेळी देखील बॉलिवूडला बदनाम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पद्धतशीरपणे लावण्यात आले. सेलिब्रिटींना त्यात दाखवून बॉलिवूड कसे नशेच्या आहारी गेले आहे, हे दाखविण्यात आले. आताही आर्यन खान प्रकरणात असाच प्रकार सुरु असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयात याचा ऊहापोह होईलच असे नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र पत्रकारांनी एनसीबीच्या माहितीवर बातमी देताना खोलात जाऊन एखाद्या प्रकरणाचा तपास केला पाहिजे अशीही भूमिका मांडली.
