यावर्षीही दांडिया/ गरबा नाही…

0
20211005_201312

यावर्षीही दांडिया/ गरबा नाही…

मुंबई, दि. 5 ऑक्टोबर:
यावर्षीही नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. त्याऐवजी आरोग्यविषयक शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती  शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे सोहळा बघण्याची व्यवस्था करावी.

नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *