संगणकीकृत सातबारा उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल
संगणकीकृत सातबारा उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल
राज्यस्तरीय मोफत सुधारित सातबारा वाटपाचा शुभारंभ.
पुणे, दि. 2 ऑक्टोबर :
नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने प्रयत्नशील असून राज्य शासनाचा संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुरंदर तालुक्यातील खळद येथे आयोजित मोफत सुधारित सातबारा वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, नागरिकांना सहज व तत्परतेने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे. नागरिकांना नवीन स्वरुपात संगणकीय सातबारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आता सातबारा नव्या रुपात पाहायला मिळेल. सातबारा समजण्यासाठी अत्यंत सोपा करण्यात आला असून प्रत्येक बाब स्पष्ट करण्यात आली आहे. महसूल विभागाच्यावतीने सातबारासोबत ई- फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ई-पीक पाहणी कार्यक्रमामुळे संपूर्ण पीकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहेत. ई-पीक पाहणीसाठी टाटा टस्ट्रचे सहकार्य महत्वपूर्ण आहे. ई- पीक पाहणी पिकाचे क्षेत्र, प्रकार, नुकसान सर्व्हेक्षण, पीक विमा यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. राज्य शासनाने सुरू केलेला हा उपक्रम संपूर्ण देशात लागू करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केल्याचे थोरात म्हणाले.
राज्यमंत्री कदम म्हणाले, ई-पीक पाहणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांना तात्काळ माहिती उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी महसूल व कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री थोरात यांच्या हस्ते मधुकर रासकर, मुक्ताबाई खळदकर, रामदास कामठे, सुनीता कारभारी, चंद्रकांत कामठे, भगवान रासकर या शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात सुधारित सातबारा वाटप करण्यात आले.
