IMG_20210929_135025

सरसकट मदतीसाठी पाठपुरावा करू

अंबाजोगाई, दि. 29 सप्टेंबर :
मागील पंधरवाड्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करताना आकडेवारी बदलत आहेत. मात्र, आता काही महसूल मंडळांमध्ये शेती मध्ये काहीच उरले नाही. अक्षरशः जमीन खरडून गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे .

रात्रीच या संपूर्ण परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून त्यांना जिल्ह्यातील एकूण परिस्थितीची माहिती दिली आहे असेही मुंडे म्हणाले.

मांजरा नदीच्या काठी पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या गावांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची व नुकसानीची पाहणी केली व एन डी आर एफ सह अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांची विचारपूस केली. देवळा येथील 51 जण मांजरा नदीच्या पुरात अडकले होते.

मागील 24 तासात जिल्ह्यात सर्वदूर तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये घरात पाणी शिरले असून त्याठिकाणी नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.

सबंध रात्रभर आपण जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून दर तासाला जिल्ह्यातील एकूण उपाययोजनेची व उपलब्ध यंत्रणांची माहिती घेत आहे व एन डी आर एफ सह अन्य बचाव पथकांना आवश्यक सूचना देत आहोत; एन डी आर एफ, अग्निशमक सह पथके बचाव कार्यात तैनात आहेत, हेलिकॉप्टर सुविधेसाठी वातावरण पूरक नसले तरी त्याचीही तयारी करून ठेवलेली आहे, असे मुंडे म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते राजेश्वर आबा चव्हाण, दत्ता आबा पाटील, गोविंदराव देशमुख, ताराचंद शिंदे, तानाजी देशमुख, रणजित चाचा लोमटे, अजित गरड यांसह अधिकारी व बचाव पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *