अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्याला जलसंपदा मंत्र्यांची भेट
अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्याला जलसंपदा मंत्र्यांची भेट
बीड , दि. २९ सप्टेंबर :
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत बीड जिल्ह्यातील परळी,अंबाजोगाई व केज तालुक्यातील विविध गावात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत पाहणी केली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती दिली तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी व पूर पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री उशिरा बैठक पार पडली.
जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल, जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.
यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिवकन्या शिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणेे,जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यासह महसूल जिल्हा परिषद जलसंपदा विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढ गरजेचे आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी साठवण प्रकल्पांचे उंची वाढविण्यासाठी प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा विचार करून निर्णय घेऊ. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने मराठवाड्यात ज्याठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील असे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले
यावेळी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यासह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.
याप्रसंगी शेतीसाठी पाण्याचे समान वाटप, सिंदफना, माजलगाव आदी प्रकल्पांसह जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांचा दुरुस्ती कामांचा आढावा आणि निर्माण झालेले अडथळे दूर करून कामे तात्काळ सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आलेे.
