लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय हवा.

0
IMG-20210927-WA0068

लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय हवा.

पैठण दि. २७ सप्टेंबर :
आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने महाविकास आघाडीचे सरकार आले असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज एकत्र सरकारमध्ये काम करत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असायला हवा. सरकार म्हणून आपल्याला संपूर्ण मदत होईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठण तालुक्यात पोहोचली. यावेळी पैठण विधानसभेचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

पैठणच्या पदाधिकाऱ्यांनी जिद्दीने व एकोप्याने काम करायला सुरुवात करायला हवी. २०१९च्या निवडणुकीत पक्षाची परिस्थिती बिकट होती. अनेक लोक पक्षाला सोडून जात होते मात्र निकाल लागल्यानंतर सगळेच वातावरण बदललं. आदरणीय पवारसाहेबांच्या झंझावाती दौऱ्यांमुळे आपली संख्या ५४ पर्यंत गेली. पवारसाहेब जिद्दीने लढले आणि कार्यकर्ते एक झाले म्हणून आपल्याला यश मिळाले पैठणच्या कार्यकर्त्यांनी यातून बोध घ्यायला हवा असा सल्लाही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. येत्या काळात पैठण येथील ब्रम्हगव्हाण प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी कोणताही निधी कमी पडणार असा प्रयत्न आम्ही करू. तसेच या भागातील इतर विकास कामांसाठी आपण प्रयत्नशील आहोत असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.

पैठण तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने पैठण धरणाच्या पायथ्याशी असलेल्या ज्ञानेश्वर उद्यानाचे सुशोभिकरण येत्या काळात केले जाणार आहे. या उद्यानाच्या माध्यमातून येथील युवकांना रोजगार मिळेल यासाठी जलसंपदा विभाग काम करत आहे. पैठणच्या पावित्र्याच्या उंचीचे हे उद्यान तयार करू असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आपला पक्ष अधिक मजबूत करायचा आहे त्यासाठी योग्य त्या तयारीला आपण तयार राहिलो पाहिजे. आपला पक्ष नेहमी जनतेसोबत राहिला ही नाळ कधी कमी होऊ देऊ नका असे आवाहनही केले.

एकमेकांची मनं साधण्यासाठी हा काळ वापरावा. पक्षांतर्गत संबंध चांगले राहिले पाहिजे. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात राष्ट्रवादीचा विजय कसा होईल हे पाहिले पाहिजे असा मोलाचा सल्लाही दिला.

शरद पवारसाहेबांसारखे पक्षाला नेतृत्व मिळाले आहे. साहेबांनी केलेल्या झंझावाती दौर्‍यामुळे पक्षांसह आघाडीतील इतर पक्षांना मदत झाली. आता शिवसेना आपल्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्या सोबतीने आपल्याला आघाडीचे काम करायचे आहे असे मार्गदर्शनही केले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, निरीक्षक संजय वाकचौरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, पैठण शहराध्यक्ष जितू परदेशी, शिवाजीराव बनकर, रंगनाथ काळे, दत्ताभाऊ गोर्डे, अप्पासाहेब निर्मळ, युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब करमळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशाल वाघचौरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *