प. महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानातून रस्त्यांचे जाळे निर्माण करू

0
20210926_133452

प. महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानातून रस्त्यांचे जाळे निर्माण करू

सातारा, दि. 26 सप्टेंबर :
पश्‍चिम महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून पश्‍चिम महाराष्ट्रात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून रस्त्याचे जाळे निर्माण करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

कराड येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 हजार 971 कोटी रुपयांचे 403 किलोमीटर लांबीच्या विविध रस्ते विकास कामांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजय पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

नागपूरसाठी स्वस्तातली मेट्रो ट्रेन सुरू करत आहोत. त्याच धर्तीवर पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती, लोणावळा जेवढे ब्रॉडगेज आहेत त्यावर आठ डब्ब्यांची मेट्रो चालू शकते. मेट्रो आठ डब्यांची असून या मेट्रोचा वेग प्रती तास 140 किलोमीटर एवढा असेल. त्यामध्ये इकॉनॉमी क्लासचे चार डब्बे, विमान सेवेप्रमाणे दोन बिझनेस क्लासचे डबे असतील. याद्वारे मालवाहतूकही करण्यात येईल. तसेच स्थानिक बेरोजगारांनाही यामाध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. या सेवेमुळे अंतर कमी वेळात पूर्ण करता येईल, असे गडकरी यांनी सांगितले.

पश्‍चिम महाराष्ट्रातील रस्त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण कायम आपल्या सोबत असू, असा विश्‍वास देत गडकरी म्हणाले, पुणे-बंगलोर हा नवा ग्रीन हायवे पुण्याप्रमाणेच या भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल. देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढती आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असणार आहे.

देशात पाणी नियोजन अत्यंत आवश्यक असून एकीकडे पूर तर एकीकडे पाणी टंचाई ही विषमता दूर करण्यासाठी पाण्याचा वापर सुनियोजित व्हायला हवा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *