प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा अधिक भक्कम करू

0
20210919_124531

प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा अधिक भक्कम करू

नांदेड, दि. 19 सप्टेंबर :
आरोग्य सेवा-सुविधा भक्कम करण्यासमवेत प्राथमिक शिक्षणाच्याही सेवा-सुविधा अधिक भक्कम करण्याकडे माझा आता कल असणार आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा अतिशय जीर्ण अवस्थेत आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी यादृष्टीने मोडकळीस आलेल्या शाळा नव्या स्वरूपात शिक्षणाशी जवळीकता साधणाऱ्या रचनेत यापुढे उभारण्यावर भर असेल. प्रत्येक गावात आदर्श शाळा धोरण जिल्ह्याने स्वीकारुन शिक्षणाचे मार्ग अधिक प्रशस्त करण्याबाबत शिक्षकांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन सा. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

येळेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजन समारंभा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या सेवा-सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मागील 2 वर्षे महाविकास आघाडी शासनाने भर देऊन काम केले आहे. कोरोनाच्या लाटेतून सावरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपलब्धताही पणास लागली. काही वर्षांपूर्वी आपण दूरदृष्टी ठेऊन ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांना, सेवा-सुविधांना भक्कम करण्याचे काम केले. आता वाढत्या लोकसंख्येनुसार अनेक गावांच्या पंचक्रोषित नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज निर्माण झाली असून त्यावर भर देण्यात येत असल्याचे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

येळेगाव येथील व पंचक्रोषीतील जवळच्या गावांना या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने साध्या आजारांनाही लोकांना नांदेडला यावे लागत होते. लोकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी येळेगाव येथे आपण प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करीत असून याठिकाणी आरोग्य केंद्राला लागणारे चांगले आरोग्य वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. कोविड-19 च्या आव्हानात्मक काळात आपण आरोग्यासाठी खूप व्यापक प्रमाणात काम केले आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या व आयुष्यमान संपलेल्या रुग्णवाहिका बदलून आपण जिल्हाभरात 68 नवीन रुग्णवाहिका घेतल्या. नांदेड येथे 300 खाटांचे नवीन हॉस्पिटल आपण उभारत आहोत. ग्रामीण भागातील युवा-युवतींना वैद्यकीय क्षेत्रात सेवेची संधी मिळावी यादृष्टिने नर्सींग कॉलेजही आपण आकारास घातले आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *