Ads

-

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून भुजबळांची निर्दोष मुक्तता

By Xtralarge News

September 9, 2021 6:21 pm

Ads

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून भुजबळांची निर्दोष मुक्तता

मुंबई, दि. ९ सप्टेंबर :
राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली.

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले, आमच्यावर खोटे नाटे आरोप झाले. आमच्यावर मीडिया ट्रायल झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावं लागलं. या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितलं. आज आम्हाला त्या केसमधून निर्दोष मुक्त केलं आहे. “तुरुंगात रहायला कुणाला आवडेल? दोन ते तीन वेळा प्रकृती अतिशय बिघडली होती. आता दुखःचा पाढा वाचण्यासाठी वेळ नाही. आता पुढे जायचे आहे. तुमचा भुजबळ करु असे म्हणणाऱ्यांना सांगायचं की त्यांचं सुद्धा भुजबळांसारखंच होईल. मला सुद्धा न्यायदेवतेने न्याय दिला आणि सोडलं. तसं त्यांना सुद्धा त्रास होणार पण ते सुद्धा मुक्त होणार.

भुजबळ पुढे म्हणाले की, ईडीची केस या प्रकरणावरुन बांधली गेली आहे. काही लोकांनी त्रासच द्यायचं ठरवलं होतं. आम्ही त्याचवेळी म्हटलं होतं, की सत्य परेशान होता है, पराजित नहीं. आम्ही विनम्रपणे हा निकाल स्वीकार करत आहोत. आमची कुणावरही तक्रार नाही. नियती कधी कधी दिवस आणते, ते भोगावे लागतात. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं या कटकारस्थानातून आम्ही मुक्त होत आहोत. माझ्यावर पक्षानं, शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असे कोर्टानं निर्णय देताना म्हटले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

No comments to show.

Leave a Comment