कल्याण डोंबिवलीसाठी निधी कमी पडू देणार नाही
कल्याण डोंबिवलीसाठी निधी कमी पडू देणार नाही
कल्याण डोंबिवली दि. 8 सप्टेंबर
कोपर पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून कोपर पुलाला समांतर आणखी एक अतिरिक्त पुल करण्यासाठी एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उर्वरित कामे मार्गी लागण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
डोंबिवलीतील कोपर पुलाच्या लोकार्पणासह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, रविंद्र फाटक, राहुल दामले, विकास म्हात्रे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, आदी उपस्थित होते. तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे ऑनलाइन उपस्थित होते.
डोंबिवलीमधील कोपर उड्डाणपूलाचे लोकार्पण, कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय प्राणवायु निर्मिती प्रकल्प व अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ह. भ. प. सावळाराम महाराजा संकुलातील प्राणवायु निर्मिती प्रकल्प, शास्त्रीनगर रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, आय वॉर्ड व महाराष्ट्र नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, टिटवाळामधील मांडा येथील स्व. गोपीनाथ मुंडे अग्निशमन केंद्र, तेजस्विनी बस व कल्याण डोंबिवली शहर दर्शन बस आणि आंबिवली येथील जैवविविधता उद्यान या प्रकल्पांचे लोकार्पण झाले.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, सक्षम आरोग्य यंत्रणा कशी उभी करावी हे कोविड काळात शिकण्यास मिळाले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र, ऑक्सिजन सुविधा निर्माण करत आहोत. कोविड परिस्थितीत सुद्धा विकास कामे थांबणार नाहीत याची दक्षता घेऊन पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केली. या काळात राज्य शासनाने निधीची कमतरता पडू दिली नाही. कोपर पुलाचे काम जलदगतीने १ वर्ष ४ महिन्यात पूर्ण करण्यात आले. कल्याण डोंबिवली तील रस्त्यांसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३६० कोटी रुपये दिले आहेत. कोपर पुलाला समांतर आणखी एक पुल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी निधी मिळावा.
आमदार चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली शहरातील विकास कामांना निधी देण्याची मागणी यावेळी केली. यावेळी कोवीड अवॉर्ड मिळाल्याबद्दल आयुक्त डॉ. सुर्यवंशी तसेच शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांचा पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
