पंचनामे झाल्यानंतर लवकरात लवकर मदत
पंचनामे झाल्यानंतर लवकरात लवकर मदत
अतिवृष्टीग्रस्त जळगाव जिल्हाची जयंत पाटलांनी केली पाहणी
जळगाव दि. 5 सप्टेंबर :
नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यसरकारने याआधीच धोरण जाहीर केलेले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयात लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुरामुळे शेती खरवडून निघाली आहे, अनेक जनावरे वाहून गेली आहेत अशी माहिती माध्यमांना दिली. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे आव्हान समोर आहे. चाळीसगाव परिसरात नदी पात्रात सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेल्या अतिरीक्त बांधकामामुळे ही पूरपरिस्थिती आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून त्याला प्रचंड विरोध स्थानिकांनी केला असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच पर्यावरणाच्या विरोधात विनापरवाना नदीपात्रात असलेले बांधकाम हटविण्याचे आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
नदी पात्रालगत सरंक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरीकांकडून समोर येत आहे. त्यामुळे गाव-वस्तीचे पुरापासून बचाव करण्यासाठी लवकरच सरंक्षण भिंत बांधण्याबाबत कार्यवाही करु असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.
चाळीसगाव भागात अतिवृष्टीनंतर काही अफवा उठत आहेत. त्यावर आवाहन करताना जयंत पाटील यांनी जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जोपर्यंत शासकीय यंत्रणा अधिकृत माहिती जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी केले.
अतिवृष्टीने फुटलेल्या बिलदरी पाझर तलावाची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्यातील जळगाव, औरंगाबाद इथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी करत आहेत. चाळीसगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तीन दिवसापूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टीने बिलदरी पाझर तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटलं होतं. त्यामुळे जयंत पाटील यांनी आज या तलावाची पाहणी केली. यावेळी अधिकारी वर्गही उपस्थित होता. पहिल्यांदा या तलावाची दुरुस्ती करू असं आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी जनतेला दिले.
बिलदरी पाझर तलाव फुटल्याने जमिनीत अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ती पाणथळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेईल अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.
आजूबाजूचा परिसर या पाझर तलावातील पाण्यावर शेती आणि घरगुती वापराच्या पाण्यासाठी अवलंबून होता. स्थानिकांची पाण्याविना कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जाईल असे ठाम आश्वासनही जयंत पाटील यांनी इथल्या नागरिकांना दिले.
