प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल
प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल
गडचिरोली, दि. 23 ऑगस्ट :
गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल. रोजगार निर्मितीसाठी आवश्यक सोयीसुविधा व दळणवळणाची साधने जिल्ह्यात उभी राहत आहेत असे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते जिल्ह्यातील 27 कोटी रुपे कामांच्या शुभारंभासह 46 वाहने व ॲम्ब्यूलन्स, ऑक्सिजन प्लांट, जलतरण तलावाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी इतर मागास बहूजन कल्याण विकास मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. जिल्हा पोलीस क्रीडांगणावर नगरपरिषदेकरीता आलेल्या फायरब्रिगेड गाड्या, आरोग्य विभागाला मुख्यमंत्री निधीमधून मिळलेल्या 9 रूग्णवाहिका, 24 लसीकरणासाठी आलेल्या रूग्णवाहिका तसेच पोलीस विभागाला जिल्हा नियोजन मधून दिलेल्या ९ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री म्हणाले, जिल्हयात विकास कामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्र सरकारकडूनही चांगल्या प्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच 500 कोटींचे रस्ते व पुलांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतिक्षेत असलेले मेडीकल कॉलेजही लवकरच अंतिम टप्प्यावर आणू.
गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे, नवीन कामांचे शुभारंभ पाहून मला असे वाटतेय की ‘अब गडचिरोली बदल रही है’ असे उद्गार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले. सद्या पालकमंत्री व आम्ही जिल्ह्यासाठी विकासाचं मोठं पाऊल टाकत आहोत. या आलेल्या वाहनांमुळे दुर्गम भागातील आरोग्य विषयक गरजा पुर्ण होतील असे ते यावेळी म्हणाले. येत्या काळात गडचिरोलीसह चंद्रपूरसाठी नव्या पध्दतीचे आधुनिक आपत्ती मध्ये मदत करणारे वाहन पुरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील नव्याने स्थापन केलेल्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते 200 ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे व बायोमेडीकल वेस्टेज व लाँड्रीचा शुभारंभही करण्यात आला. यानंतर कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यानाच्या 2.5 कोटी रूपये नूतनीकरण कामाचा शुभारंभही त्यांनी केला. कॉम्प्लेक्स परिसरातीलच नव्याने नूतनीकरण केलेला जलतरण तलावाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी क्रीडा संकुल मधील बॅडमिंटन कोर्टवर खेळून क्रीडा विषयक संदेश दिला.
पोटेगाव रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या नविन बांधकामाकाचे भूमिपूजन ही करण्यात आले. याकरीता अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून रु. 44.51 कोटीचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केला आहे. यातील 27 कोटी रूपयांना प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. पैकी बांधकामाकरीता रुपये 24 कोटी 31 लक्ष रूपयाचे काम सुरू करण्यात येणार आहे. माहे ऑगस्ट 2021 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले असून नियोजित कालावधी 18 महिन्याचा आहे. सदर कामामध्ये प्रशासकीय इमारत तयार करणे, इनडोअर हॉल, बॅडमिंटन हॉल, 2 सुरक्षारक्षक कक्ष सोबत 1 मुख्य प्रवेश द्वार, कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) बांधण्यात येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात जिल्हा क्रीडा संकुलाकरीता उपलब्ध असलेल्या जागेवर रुपये 35 कोटी खेळाकरीता नियोजित असून त्यात प्रेक्षक गॅलरी, मुलामुलींचे वसतीगृह, जलतरण तलाव, विविध खेळांचे मैदान, अंतर्गत रस्ते व नाल्या बांधकाम नियोजित आहे.
