Ads

--

आंबेडकरांचा द्वेष करणाऱ्यांना नरेंद्र मोदी फॉलो कसे करतात?

By Xtralarge News

August 14, 2021 6:56 pm

Ads

आंबेडकरांचा द्वेष करणाऱ्यांना नरेंद्र मोदी फॉलो कसे करतात?

बाबासाहेबांबद्दल अवमानकारक ट्विट करणारे ट्विटर अकांऊट तात्काळ बंद करा.

मुंबई, दि. 14 ऑगस्ट:
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश करणाऱ्या पोस्टरला आक्षेप घेणाऱ्या गीतीका नावाच्या एका भाडोत्री ट्रोलला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी का फॉलो करतात? हा देशाच्या राज्यघटनेला मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

बाबासाहेबांबद्दल अवमानकारक ट्विट करणारे ट्विटर अकांऊट तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? असा सवाल उपस्थित करणाऱ्या गीतिका व तिला फॉलो करणाऱ्याच्या डोक्यात असे निर्बूध्द प्रश्न नागपूरच्या रा. स्व. संघाच्या वर्गात बौद्धीक घेतलेल्यांच्या सडक्या डोक्यातून येत असतात. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षांचा इतिहास माहित नाही, ते सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करीत असतात,अशा शब्दांत डॉ. राऊत यांनी विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा समाचार घेतला.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप यांनी संविधान, भारताचा तिरंगा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच विरोध आणि तिरस्कार केला आहे. या ताज्या ट्विटने पुन्हा एकदा मोदी,भाजप आणि संघ परिवाराचा खरा विद्वेषी चेहरा उघडकीस आणला आहे,” अशी टीका डॉ. राऊत यांनी केली.

“दुर्दैव असे आहे की या भाडोत्री ट्रोल्सला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात. एकीकडे निवडणुकीच्या पूर्वी दलितांचे पाय धुवायचे व दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अश्लाघ्य आरोप करणाऱ्या शिवराळ ट्रोल्सना फॉलो करायचे, हा दुटप्पीपणा देशाच्या पंतप्रधानांना शोभणारा नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर विकृतपणे आनंद व्यक्त करणाऱ्या निखिल दधिच, आशिष मिश्रा यांनाही मोदी फॉलो करतात. यावरून भाजप, संघ परिवार आणि मोदी यांच्या मनात किती द्वेष, घृणा साचली आहे, हे दिसून येते,” असेही डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

“डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल मोदींतर्फे व्यक्त करण्यात येणारा आदर हा केवळ दिखावा आहे. मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आतून बाबासाहेबांचा आणि दलितांचा द्वेष करतात, हे यावरून आता सिद्ध झाले आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.
बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्यांनी आणि तिला छुपा पाठिंबा देणाऱ्यांनी तात्काळ देशाची आणि आंबेडकरी जनतेची माफी मागावी, अशी मागणी ही त्यांनी केली.
दिल्लीत बलात्कार आणि नंतर हत्या करण्यात आलेल्या ९ वर्षीय दलित मुलीचे प्रकरण लावून धरल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करणाऱ्या टि्वटर इंडीयाने आता राज्य घटनेच्या शिल्पकाराचा अपमान करणाऱ्या गीतीका नावाच्या भाडोत्री ट्रोल्सचे अकांऊट सस्पेंड करावे, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment