शेगावच्या गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन
शेगावच्या गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन.
मुंबई, दि. ४ ऑगस्ट :
श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी आज सायंकाळी 5 वाजता अखेरचा श्वास घेतला. घराजवळच्या शेतातच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
शिवशंकरभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..
शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे अशा शोकभावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.
शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानं एक व्रतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोगी, अध्यात्माच्या माध्यमातून मानवसेवेचा डोंगर उभा करणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं आहे. संस्थानमार्फत त्यांनी उभारलेली यंत्रणा, काम जगभरातल्या युवांसाठी प्रेरणादायी आहे अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली आहे.
शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते.
शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते अशी श्रद्धांजली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ‘श्री गजानन महाराज संस्थानाच्या जडणघडणीत देखील शिवशंकरभाऊंच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे व नियोजनाचे मोठे योगदान आहे. स्वच्छतेला धार्मिक अधिष्ठान देत आनंदसागर सारखं नंदनवन त्यांनी उभं केलं.अध्यात्मिकतेला समाजसेवेची जोड देत शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर चालवलेला सेवायज्ञ अनेकांसाठी आदर्शवत आहे. शिवशंकर भाऊंच्या स्पृहणीय व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण आदरांजली’.
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे सर्वेसर्वा कर्मयोगी आदरणीय श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यांच्या निधनाने लाखो लोकांच्या आयुष्यांतील ‘आनंदसागर’ आज हरपला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून अध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श घालून दिला. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शेगावचे गजानन महाराज मंदिर. गजानन महाराज मंदिराच्या सेवाकार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. भाऊसाहेबांनी संस्थानच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे केले. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारल्या. भाऊंची अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. गजानन महाराजांच्या विचाराचा वारसा त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांनी केलेले कार्य चिरंतर राहिल. शंकरभाऊंच्या निधनाने गजानन महाराजांच्या भक्तांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे.
