Ads

--

एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला

By Xtralarge News

July 31, 2021 11:51 am

Ads

एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला

मुंबई, दि.  ३१ जुलै :

राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला, या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.

मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

No comments to show.

Leave a Comment