काँग्रेसच्या माणिकराव जगतापांचे निधन

0
FB_IMG_1627283907044

काँग्रेसच्या माणिकराव जगतापांचे निधन

मुंबई, दि. २६ जुलै:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे आज मुंबईत निधन झाले. जगताप यांना करोनाची लागण झाली होती त्यानंतर उपचारांसाठी त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

माणिकराव जगताप यांना मान्यवरांची श्रद्धांजली….

महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोनाने अनेक निकटवर्तीयांना आपल्यापासून हिरावून घेतले आहे. माणिकराव कोरोनावर मात करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील असे वाटत असतानाच त्यांचा निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. माणिकराव हे उत्तम वक्ते, कुशल संघटक होते. सर्वांना बरोबर घेऊन काम करत. लोकांचे प्रश्न ते हिरीरीने मांडत. कोकणात काँग्रेस पक्षाचे संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थी असताना एनएसयुआयमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी महाड मतदार संघातून विजयी संपादन केला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम त्यांनी केले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
जगताप यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे व वयैक्तिक माझी मोठी हानी झाली आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. माणिकराव जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार, आमचे मित्र, सहकारी माणिकराव जगताप यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्यांच्या निधनाने जनमाणसाचं प्रेम लाभलेला, रायगड जिल्ह्याचा, कोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. माणिकराव यांच्या कन्या स्‍नेहल, सुपुत्र श्रीयश आणि संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *