Ads

---

मोदींचा PM पदाचा ४३९८ दिवसांचा विक्रम !

By Xtralarge News

June 11, 2026 1:35 pm

Ads

मोदींचा PM पदाचा ४३९८ दिवसांचा विक्रम !

नवी दिल्ली, ता. ११ जून :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली असून देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्राच्या विकासालाही त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व गती मिळाली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

शिंदे म्हणाले की, इतिहासात सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ४३९८ दिवसांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र त्यांनी केवळ विक्रमच केला नाही, तर भारताचा डंका जगभरात वाजवण्याचे काम केले आहे. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणली असून ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा त्यांचा संकल्प आहे. भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटत आहे.

मोदी यांनी विकसित भारत २०४७ ही संकल्पना मांडून पुढील २१ वर्षांचा रोडमॅप देशासमोर ठेवला आहे. त्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली असून ३३ देशांचे सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासातही मोदी यांचे मोठे योगदान असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला दोन लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, तर मोदी सरकारने बारा वर्षांत दहा लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ऐतिहासिक काम मोदी सरकारने केले. मराठी भाषेचा देशभर प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठीही प्रयत्न करण्यात आले. ‘विकास ते विरासत’ या संकल्पनेतून विकासाबरोबरच सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात आले. यूपीए सरकारच्या काळातील पायाभूत सुविधांच्या तुलनेत दुप्पट इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आले असून विमानतळांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे.

No comments to show.

Leave a Comment