राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत अभूतपूर्व यश.
नागपूर, दि. १६ डिसेंबर ;
सर्वांची भाकीते खोटी ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले आहे. आज चांद्यापासून बांद्यापर्यंत हे यश आपल्याला मिळाले आहे आणि त्यात विदर्भाचा वाटा मोठा असल्याची कौतुकाची थाप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विदर्भातील कार्यकर्त्यांच्या पाठीवर मारली.
महाराष्ट्राचे हित लक्षात घेत आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो हे सांगतानाच शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करत असताना आपल्यावर संशय व्यक्त करण्यात आला परंतु आम्ही आजही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही असे ठणकावून सुनिल तटकरे यांनी सांगितले.
लोकसभेचा पराभव पचवला आणि आत्मविश्वासाने आपण उभे राहिलो आणि विधानसभेत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाला संजीवनी मिळाली आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
अजित पवारांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लाडक्या बहिणींनी दादांच्यावर विश्वास दाखवला. लोकसभेचा पराजय पचवला तसा विजयाने आता हुरळून जाता कामा नये असा सबुरीचा सल्लाही सुनिल तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद निर्माण करुन येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले संविधान जोपर्यंत चंद्र – सुर्य – तारे आहेत तोपर्यंत कोणी बदलू शकत नाही असे पुन्हा एकदा विरोधकांना सुनिल तटकरे यांनी ठणकावून सांगितले.
विदर्भाची भूमी आज अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिली आहे त्याबद्दल इथल्या जनतेचे सुनिल तटकरे यांनी आभार मानले.
या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री संजय बनसोडे, माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री अनिल पाटील, आमदार इंद्रनील नाईक, आमदार राजू कारेमोरे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुलभा खोडके, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार मनोज कायंदे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, आमदार संग्राम जगताप, आमदार प्रतापराव पाटील, आमदार राजकुमार बडोले , युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार राजेंद्र जैन, नागपूर शहराध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आदींसह पक्षाचे सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याच्या अगोदर सकाळी विदर्भ, नागपूर शहर आणि ग्रामीण भागासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार राजेंद्र जैन आदींसह नागपूर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.