मुस्लिम आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा एमआयएमचा इशारा
मुस्लिम आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा एमआयएमचा इशारा..
मुंबई, दि. १२ डिसेंबर
महाविकास आघाडीने सत्तेत आल्यापासून दोन वर्षात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मुस्लिमांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मते दिली मात्र सत्तेसाठी बाबरी मशीद पाडण्याचे समर्थन करणार्या शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असा हल्ला करत मुस्लिम आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिला.
मुंबईतील चांदवली येथील एमआयएमच्या रॅलीत औवेसी बोलत होते. मुस्लिम समाजाला 5 टक्के शैक्षणिक आरक्षण द्यावे आणि वक्फ जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवावे या मागण्यांसाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद ते मुंबई अशी तिरंगा रॅली काढण्यात आली होती.
औवेसी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या ८३ टक्के मुसलमानांकडे जमीन नाही तर १ टक्के मराठ्यांकडे जमीन नाही. ४० टक्के मराठ्यांना बँकाकडून कर्ज मिळते तर फक्त ५.८ टक्के मुसलमानांना बँक आणि सहकारी संस्थांकडून कर्ज मिळते. १५.५२ टक्के मराठा जिल्हाधिकारी आहेत तर एकही मुसलमान जिल्हाधिकारी नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे हृदय फक्त मराठ्यांसाठीच धडकते का? धर्मनिरपेक्षतेने मुस्लीम समाजाला काय दिला असा सवाल करत आता पक्ष, झेंडे विसरून समाजाने एमआयएमला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. एमआयएम मते खाईल या भीतीने मुस्लिमांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान केले. पण आज दोन्ही काँग्रेस शिवसेनेच्या मांडीवर बसले आहेत.
एमआयएमच्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तसेच १४४ कलम लागू केले होते परंतु पोलिसांचे आदेश धुडकावून एमआयएमने रॅली घेतली.
