सरकारी बंधनामुळे यंदा बाप्पाची मूर्ती फक्त ४ फुटच!

0
bappa

मुंबई दि.११ जुलै २०२०

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असून संपूर्ण गणेशोत्सव हा शासकीय नियमांच्या बंधनातच साजरा करावा लागणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या बंधनात अडकलेल्या बाप्पाची मूर्ती सार्वजनिक ठिकाणी फक्त ४ फुटांपर्यंतच असेल तर घरगुती गणेशमुर्ती केवळ दोन फुटांपर्यंतची असेल. राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्याचे पालन सर्व गणेश मंडळांनी करावे, असे आवाहन, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

या मार्गदर्शक सुचनांमध्ये पुढे असे म्हटले आहे की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेऊन न्यायालयाचे आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांच्या धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचेच मंडप उभारण्यात यावे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीच्या सजावटीमध्ये भपकेबाजी नसावी. पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे अथवा जवळच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे.

गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्‍य आहे. जेणेकरून श्री गणेशाचे आगमन/विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.

गणेशोत्सवासाठी देणगी/वर्गणी स्वेच्छेने दिलास घ्यावी तसेच जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही हे पहावे. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

आरती, भजन, कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम, मास्क,

सँनीटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. बाप्पाची आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

शासनाच्या या भरगच्च मार्गदर्शक सूचना गृह विभागाच्या परिपत्रकामार्फत देण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन गृह विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *