अबब, घरचे वीज बील तब्बल लाखाचे !
मुंबई, दि. ५ जुलै २०२०
कोरोनामुळे तीन महिने लॉकडाउन होता या काळात वीज कंपन्यांनी मिटर रिडिंग न करता सरासरी बील पाठवले आणि त्यांनतर जुलैचे बिल मात्र मिटर रिडिंग करुन पाठवले आणि हे वीज बिल पाहूनच अनेकांचा ४४० चा करंट लागला. अनेक सर्वसामान्य कुटुंबातील वीजबिलही २५-३० हजार तर काहींना ४० हजारही आली. यात काही सेलिब्रिटींनाही विजबिलाचा शॉक बसला. अर्शद वारसी या अभिनेत्याला तब्बल एक लाख रुपयाचे बिल आले. हे पाहूनच अर्शदनं अदानी विज कंपनीची आयमाय एक केली. ट्विटरवर त्याने अदानी कंपनीला रस्त्यावरचे लुटारु म्हणून आपला राग व्यक्त केला.
अर्शद हा काही एकटाच नाही ज्याला वीजबिलाचा करंट लागला. तापसी पन्नूलाही ३६ हजार रुपयांचे बील आले, तर रेणुका शहाणे यांना १८ हजार रुपयांचे विज बिल आले आहे. कार्तिका नायरलाही एक लाखांचे वीज बिल आले आहे.
हे सगळे सेलेब्रिटी आहेत म्हणूनच त्यातल्या काहींचे सेटलमेंट झाले पण सर्वसामान्य लोकांच्या भरमसाठ विज बिलाचे काय. अजूनही महावितरण ही आपली सरकारी कंपनी लोकांचे ऐकायलाच तयार नाही. वर्क फॉर्म होम आणि उन्हाळ्यात सर्वजण घरीच होते म्हणून वीज बिल वाढले असे सांगत आकडे मांडत लोकांची बोळवण करत आहेत. सरकारीबाबू ते बाबूच पण वीजमंत्री सुद्धा त्याच पंगतीत बसले. तेही म्हणतात विज बिल लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरी होते, विजेचा वापर वाढला, वर्क फ्रॉम होम मुळे वीज बिल वाढले. पण मंत्री महोदयांनी थोडं वास्तवाचं भान ठेवायला हवं. सरकारी बाबूंनी दिलेले आकडे वाचण्यापेक्षा यात काय गौडबंगाल आहे याचा शोध घ्यायला हवा पण काय करणार ते पडले मंत्री आता सत्तेची उब लागत आहे त्यामुळे सामान्य जनतेची दखल घ्यायची कशाला ?
