भाजपा तर शेतक-यांना लुटणारा पक्ष !
भाजप हा शेतकर्यांचा पक्ष नसून शेतकर्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष.
मुंबई दि. ७ डिसेंबर :
भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागच्या ११ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. तसेच सामान्य लोकांनी या बंदला उस्फूर्त प्रतिसाद द्य्यावा असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा देताच भाजपने आदरणीय खासदार शरद पवार साहेब हे कृषीमंत्री असतानाचे एक पत्र व्हायरल केले आहे. खरंतर पवारसाहेबांनी तेव्हा सर्वसमावेशक आणि व्यापक अशा ‘Model APMC Act’ साठी राज्यांना सूट दिली होती. मात्र मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामध्ये राज्यांना आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
आदरणीय शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना त्यांनी कोणताही निर्णय एकट्याने घेतला नव्हता. निर्णय घेत असताना त्यांनी राज्याचे म्हणणे ऐकून घेतले तसेच केंद्राचा कायदा सरसकट न लादता राज्यांनाही त्यांच्यापद्धतीने बदल करण्याचे अधिकार दिले. मोदी सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना निष्प्रभ केले आहे. तसेच हमीभावाबद्दल कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर मोदी सरकार हमीभाव कायद्यात अंतर्भूत असल्याचा शब्द देत आहे. मात्र सरकार हे शब्दांनी नाही तर कायद्याने चालते, त्यामुळे कायद्यात हमीभावाचे आश्वासन असायला पाहीजे होते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
