‘पाचोळाकार’ प्रा. रा. रं. बोराडेंचे निधन.

0
ra-r-borade-

‘पाचोळाकार’ प्रा. रा. रं. बोराडेंचे निधन.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी;

ज्येष्ठ मराठी साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे आज वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  बोराडे यांच्या निधनामुळे ग्रामीण जीवनातील बदलती समाजव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या नातेसंबंधांचे नवे आयाम मांडणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

पाचोळा ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली, त्यांच्या आमदार सौभाग्यवती या कादंबरीवर नाटकही आले आहे. चारापाणी या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला होता.  कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा आदी कथासंग्रहासह शिका तुम्ही हो शिका, ही बालकादंबरी, रहाट पाळणा आदी साहित्य निर्मिती बोराडे यांच्या लेखणीतून उतरली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, १९८९ साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अशी विविध पदे त्यांनी भूषवली.  साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. नुकताच त्यांना  विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला पण या पुरस्काराचा मान सन्मान कार्यक्रम होण्याआधीच त्यांचे निधन झाले.

मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील अशा प्रा. रा. रं. बोराडे यांचे निधन या चळवळीची हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘पाचोळाकार’ म्हणून लोकप्रियता मिळविणारे प्रा. बोराडे मराठीचे अध्यापन, साहित्य चळवळ अशा सर्वच ठिकाणी हिरीरीने पुढे राहिले. प्रा. बोराडे यांनी आपल्या अस्सल ग्रामीण साहित्यकृतींनी साहित्यात मोलाची भर घातली.  अनेक साहित्यिक, नवोदितांसाठी ते मार्गदर्शक म्हणून आदरस्थानी होते. त्यांनी ग्रामीण साहित्य चळवळ आणि त्यातील विविध प्रवाहांना बळ दिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील समर्पित सेवायात्री हरपल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *