मुख्यमंत्रीपदी फडणवीसच, सत्तास्थापनेचा दावा.
मुंबई, दि. ४ डिसेंबर;
राजभवन येथे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी यांच्याकडे महायुतीच्या वतीनं सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महायुतीतील इतर घटक पक्षांतर्फे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देणारे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री मा. निर्मला सीतारामन, विजय रूपानी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार रावसाहेब दानवे पाटील यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. जनमताचा कौल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर दिसून आला. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच अपेक्षा होती. भाजप विधीमंडळ पक्षाने सर्वानुमते त्यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली याचा आनंद व समाधान आहे. मुख्यमंत्री म्हणून पुढील पाच वर्ष ते महाराष्ट्राला स्थिर सरकार देतील. ते लोकप्रिय आहेत, अनुभवी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सक्षम सरकार आणि कार्यक्षम प्रशासन मिळेल असे अशोक चव्हाण म्हणाले.