आता मिशन मुंबई महानगरपालिका !
मुंबई, दि. ३ डिसेंबर ;
विधानसभा निवडणूकीमधील अपयश झटकून उद्धव ठाकरे कामाला लागले असून महानगर पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढली, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार, असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितले आहे.
पक्षाच्या माजी नगरसेवकांना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सूचना आणि मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे, त्याला योग्य तो प्रतिवाद करा. भाजप पक्षाचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात, तसे आपणही तळागाळात जाऊन काम केले पाहिजे.
ईव्हीएमचा मुद्दा तर आहेच मात्र त्याबाबत आम्ही बघू, तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकतीने कामाला लागा. निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका.
पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.