धाराशिव, दि.१५ सप्टेंबर:
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे.त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
परंडा येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर अनेकांनी याविषयी शंका उपस्थित केल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, महिला सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेवून राज्य शासनाने ही योजना प्रभावीपणे राबविली. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे.लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद असाच कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या इतरही योजना यापुढेही सुरु राहतील. लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे असे सांगून या योजनांसाठी निधीची तरतूदही शासनाने केली असल्याचे शिंदे म्हणाले. भविष्यात या योजनेचा लाभ टप्प्या- टप्प्याने वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे.गरीब कुटुंबातील महिलांच्या दृष्टीने दीड हजार रुपयांचे मूल्य खूप मोठे आहे, हे अनेकांना माहित नाही.नुकतेच माझी भेट झाल्यानंतर प्रणाली बारड या बहिणीने मला सांगितले की, दीड हजार रुपयातून तिने घुंगरू कडीचा व्यवसाय सुरु केला.गौरी गणपतीच्या सणात तिला या व्यवसायातून दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.याच प्रकारे इतरही भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे आपापल्या परीने विविध व्यवसायात गुंतविले आहे. त्यातून त्यांच्या व्यवसायाला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर तोट्यातील एसटी महामंडळ नफ्यात आले. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेही राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान न होता चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना एका वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेवून त्यांच्या शिक्षणाला पाठबळ दिले आहे.मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत तिच्या बँक खात्यात टप्प्या-टप्प्याने एक लाख रुपये जमा करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु केली आहे. लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करून त्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रशिक्षणार्थींना राज्य शासन दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन देणार आहे अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.