• Thu. Oct 10th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 288 Today: 1 Total: 3834033

मुंबई, दि. १३ सप्टेंबर;

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने कोट्यवधी रुपये खर्च केले, खासदारकी रद्द केली, शासकीय घर काढून घेतले, ईडीची चौकशी मागे लावली पण देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला चोख उत्तर देत काँग्रेस इंडिया आघाडीला साथ दिली. भाजपा व काँग्रेसमध्ये विचारधारेची लढाई आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले व डरो मतचा संदेश दिला. पण काही शक्ती देशाचे विभाजन करु पाहत आहेत त्यांना उत्तर देण्याची आता वेळ आली आहे, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

 

प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार व गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, शिवाजीराव मोघे, सतीश चतुर्वेदी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार नामदेव किरसान, खासदार श्याम बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बनसोडे आदी उपस्थित होते.

 

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार सर्वात घोटाळेबाज सरकार आहे. पंतप्रधानांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यांनाच सत्तेत घेतले. भाजपा युती सरकार आयाराम गयाराम सरकार आहे, या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्यास राज्यातील जनता तयार आहे. विदर्भाची जनतेने नेहमीच काँग्रेस साथ दिली आहे आता विधानसभा निवडणुकीही ते अशीच साथ देतील असा विश्वास व्यक्त करुन गोपाळ अगरवाल यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा हटवून सर्व समाज घटकाला आरक्षणाचा लाभ मिळावा अशी भूमिका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. भाजपा सरकारने सरकारी संस्था विकून नोकऱ्या संपवल्या, संवैधानिक संस्था संपवण्याचे काम केले त्या भाजपाचा भांडाफोड केला आहे म्हणून भाजपा राहुल गांधी यांच्याविरोधात खोटा प्रचार करत आहे. राहुल गांधी आरक्षण विरोधी आहेत हा भाजपाचा आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशी अवस्था आहे.

 

गोंदिया शहराचा राईस सिटी असा लौकिक आहे पण हा व्यवसाय भाजपा सरकारच्या धोरणामुळे संपुष्टात आला आहे. धानाला एमएसपी मिळत नाही, काँग्रेस मविआ सरकार आल्यानंतर धानाला योग्य भाव देऊ व बोनसही देऊ. गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास विरोधी पक्षांनी होऊ दिला नाही, काँग्रेस सरकार आल्यानंतर या जिल्ह्याच्या विकासाला चालना देऊ. महाराष्ट्रातील भाजपा युतीचे अत्याचारी सरकार आहे या सरकारला जनताच नेस्तनाबूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

 

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विदर्भातील जनतेने काँग्रेस मविआला चांगली साथ दिली, विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही चांगले यश देतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टचार करणाऱ्या भाजपा युती सरकारला घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. महायुतीला विधानसभा निवडणुकीत १०० जागाही मिळणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मोदी सरकारची खूर्ची डळमळीत झाली आहे, वाजपेयी सरकारच्या १३ महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती होईल असेही चव्हाण म्हणाले.

 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, भाजपा सरकार बहिणींच्या साडीवर १८ टक्के जीएसटी लावून लुटते आणि १५०० रुपये देते. भाजपा बजरंग बलीच्या नावाने, श्रीरामाच्या नावाने मते मागते पण लोकसभा निवडणुकीत त्यांना श्रीरामही पावले नाहीत आणि बजरंग बलीही पावले नाहीत. जेव्हा जेव्हा विदर्भाची काँग्रेसला साथ मिळते त्या त्या वेळेस महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येते. विदर्भ काँग्रेसची भूमी आहे, या मातीतच भारतीय जनता पक्षाला गाडून विजयाची पताका उभारु. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल असा विश्वासही वडेट्टीवार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *