वांद्रे रेक्लेमेशन म्हाडा संक्रमण शिबीराच्या पुनर्विकासाचे रखडलेले विषय एका महिन्यात मार्गी लावू.
भाजपा आ. आशिष शेलार यांच्या मागणीवर गृहनिर्माण मंत्र्यांची ग्वाही.
मुंबई, दि. 8 सप्टेंबर 2020:
मुबंई शहरातील उपकार प्राप्त इमारतींचा पुनर्विकास वेगाने व्हावा म्हणून शासन विचार करते आहे, त्याच न्यायाने मुंबई उपनगरातील इमारतीच्या पुनर्विकासाचा विचार व्हावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत आज पुन्हा आज केली. तसेच त्यांनी मांडलेल्या वांद्रे पश्चिम येथील म्हाडा संक्रमण शिबीराचा पुनर्विकासाचे रखडलेले विषय एका महिन्यात मार्गी लागतील अशी, ग्वाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत गृहनिर्माण विभागातर्फे उपकरप्राप्त विधेयक मांडण्यात आले होते त्या विधेयकावर बोलताना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, म्हाडाचे संक्रमण शिबीराचा पुनर्विकासाचा रखडलेल्या विषयासह म्हाडा इमारती शेजारी असणाऱ्या जागेचा अधिकाऱ्यांनी “मोकळी जागा” असा अर्थ लावल्याने या इमारतींच्या रखडलेल्या कन्वेन्स डिड याकडे सरकारचे लक्ष वेधले.
मुंबईतील म्हाडाच्या शहर विभागात असणाऱ्या उपकर प्राप्त इमारती आहेत त्या पुनर्विकासाला गेल्यानंतर तीन वर्षात कामाला सुरुवात झाली नाही. पुनर्विकासाचा प्रस्ताव रखडला तर त्या म्हाडा ताब्यात घेऊन पुनर्विकास करेल, अशी सुधारणा कायद्यात करण्यात आली. त्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी स्वागत केले. तसेच मुंबई उपनगरातील अनेक जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांच्या पुनर्विकासाची योजना जमीन मालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे रखडत आहेत त्यामुळे ज्या न्यायाने सरकार शहरातील इमारतीच्या पुनर्विकासाचा हा कायदा करते आहे. त्याच न्यायाने उपनगरातील इमारतींना विचार व्हावा अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. याबाबत ते सतत पाठपुरावा करीत आहे.
तसेच वांद्रे पश्चिम रेक्लेमेशन येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाची योजना तयार होऊन 14 वर्षे झाली त्याचा सातत्याने पाठपुरावा करुन ही अनेक नियमातील अडचणींमुळे अद्याप गती आलेली नाही. तसेच या संक्रमण शिबीरा शेजारी झोपडपट्टी असून त्या झोपड्यांचा पनर्विकास या संक्रमण शिबीरा सोबत झाला तरच हा प्रस्ताव पुढे जाऊ शकतो त्यामुळे त्या झोपड्यांच्या पुनर्विकासाला परवानगी द्या, आणि वांद्रे पश्चिम येथील संक्रमण शिबीरातील रहिवाशांचा चौदा वर्षांचा वनवास संपवा, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. या योजनेतील रखडलेले सर्व विषय महिन्याभरात मार्गी लावू असे मंत्र्यांनी आज जाहीर केले.
तसेच म्हाडाच्या इमारतीच्या बाजूला फायरब्रिगेड आणि अन्य नियमानुसार सोडण्यात आलेली जागा ही “मोकळी जागा” अशी गणना म्हाडाचे अधिकारी करीत आहेत. या जागा “रिकामी जागा” म्हणून सोडण्यात आलेली नसुन इमारत बांधताना प्रचलित नियमांप्रमाणे आवश्यक जी जागा सोडली जाते,त्याचा चुकीचा अर्थ म्हाडा अधिकाऱ्यांनी घेतल्याने या इमारतींचे कन्वेस डिड रखडले आहेत वांद्रे पश्चिम विधान सभा मतदारसंघात रेक्लेमेशन परिसरात अशा इमारती असून याबाबत मंत्री महोदयांनी लक्ष द्यावे अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. दरम्यान याबाबत लवकरच निर्णय घेऊन, “आवश्यक ती मोकळी जागा” म्हणजे किती जागा याबाबत स्पष्टता आणली जाईल, व हा प्रश्न निकाली काढू असेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
