अजित पवारांच्या कंपन्यावरील आयकर धाडीवरून राष्ट्रवादी आक्रमक
अजित पवारांच्या कंपन्यावरील आयकर धाडीवरून राष्ट्रवादी आक्रमक
भ्रष्टाचारमुक्त म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे आहे का?
मुंबई, दि. ८ ऑक्टोबर :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्या व बहीणींच्या घरावर आयकर विभागाने छापे मारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायामुळे महाविकास आघाडीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाला थेट अंगावर घेण्याची भूमिका घेतली आहे.
अजित पवार व नातेवाईकांच्या घर व कंपन्यांवर आयकर विभागाच्या छापेमायीवर नवाब मलिक म्हणाले की, अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाची कारवाई होते, आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, ते या प्रकरणात अगोदर खुलासे मागू शकले असते परंतु त्यांनी तसं न करता केवळ बदनामी करण्याचा प्रकार केला आहे. अशा प्रकारच्या कारवाई विरोधात कोर्टात जाणार आहोत.
महाविकास आघाडी सरकारचे नेते कुणाला घाबरणार नाहीत. महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहेत. भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे असं आहे का? आता जे भाजपमध्ये गेले त्यांनी भाजपच्या गंगेत डुबकी मारली आहे. भाजपच्या काही आजी – माजी मंत्र्यांनी बऱ्याच बँका बुडवल्या आहेत. त्यांची प्रकरणे देखील आम्ही बाहेर काढणार आहोत. नुसते आम्ही आरोप करत बसत नाही. पुराव्यासकट आम्ही आरोप करणार आहोत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
