निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा ‘वाटाघाटीचा’ नवा धंदा

0
IMG_20210618_204246

निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा ‘वाटाघाटीचा’ नवा धंदा

शिवसेना राज्यसभा सदस्यांच्या जावयाकडून थिअटर मालकांशी वाटाघाटी

मुंबई, दि. 1 सप्टेंबर :

ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले “वाटघाटी” झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. असा आरोप माजी मंत्री भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

शेलार म्हणाले की, घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत, वाटाघाटी करु शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का?
राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतला एका राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करु असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करावेत, अन्यथा आम्ही नाव जाहीर करु, असा गर्भित इशाराही यावेळी आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

आमदार आशिष शेलार वांद्रे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बळाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या, जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आठवण करून देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय? म्हणून आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय? ज्या पद्धतीने बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय.

गेल्या दिड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने, ठाकरे सरकारने, सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचे रेकॉर्ड उद्धव ठाकरे यांच्या नावावर लिहिले जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे.

मुख्यमंत्री म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा करोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते तर मग रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का?
आणि म्हणून केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला सांगितलं होतं टेस्ट वाढवा, वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेचे आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका. सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या बाजूने भाजपा आहे, पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या सिलेक्टीव्ह कामामध्ये आम्ही बरोबर नाही. आम्ही त्या विरोधात आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, नियम नियमावली करून मंदिर उघडा, प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदु सणांवर आक्रमण बंद करा. एका विशिष्ट वर्गाची मत मिळायला लागल्यापासून गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवसेनेने हे काम सुरू केले आहे. याची सुरुवात बेहराम पाड्यापासून झाली आहे. या बेहराम पाड्यात शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आणि सर्वे मध्ये एका विशिष्ट वर्गाची मते मिळत आहेत असे दिसू लागल्यावर शिवसेनेने एका विशिष्ट वर्गाचे लांगुलचालन सुरु केले आहे. लालबाग, परळ आणि महाराष्ट्रातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्हाला तुमचे राजकारण लखलाभ सामान्य जनतेसाठी आम्ही आवाज उठवत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *